Ad will apear here
Next
उत्सवातील कोहिनूर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्याच्या गणेशोत्सवातील जणू कोहिनूरच ठरला आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण पुण्याचा गणेशोत्सव बघायला केवळ देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येतात. पुण्यात आलेला कोणीही गणेशभक्त दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुणे सोडतच नाही, हेही तेवढेच सत्य आहे. या गणपती मंडळाबद्दल...
...........

लोकमान्य टिळकांनी १८९३मध्ये समाजप्रबोधनासाठी लावलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची अमृतवेल विविध स्मृतींचा ठेवा जपत बहरत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा जणू मुकुटमणी ठरत आहे. आजचा विस्तारित स्वरूपाचा हा गणेशोत्सव याच अमृतवेलीचा सुगंध आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

या उत्सवातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा जणू कोहिनूरच ठरला आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण पुण्याचा गणेशोत्सव बघायला केवळ देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येतात. पुण्यात आलेला कोणीही गणेशभक्त दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुणे सोडतच नाही, हेही तेवढेच सत्य आहे.

१८९३पासून कोतवाल चावडीचा आणि बाहुलीच्या हौदाजवळचा गणेशोत्सव सुरू झाला. या वर्षीपासूनच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा किवा अकरा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. दगडूशेठ हलवाई यांनी बसवलेल्या या गणपतीला तेव्हा बाहुलीच्या हौदाचा गणपती म्हणत. सार्वजनिक गणेशोत्सवाला तीन वर्षे होत नाहीत, तोच पुण्यात १८९६मध्ये प्लेगची साथ आली होती. या प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दर वर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत. त्या वेळी ऐन तारुण्यात असलेले तात्यासाहेब गोडसे हे या गणेशोत्सवाचे एक उत्साही कार्यकर्ते होते. नंतरच्या काळात जेव्हा लोकमान्य टिळकांनी, स्वातंत्र्य-चळवळीसाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले, तेव्हा दगडूशेठ गणपतीला पुण्यातील सर्वाधिक लोकप्रियतेचे आणि आदराचे स्थान मिळाले.

१९५२ साली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर-उत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तात्यासाहेब आणि त्यांच्या मित्रमंडळींवर येऊन पडली. तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे सहकारी मामासाहेब रासने, अॅड. शंकरराव सूर्यवंशी आणि के. डी. रासने या मंडळींनी हा उत्सव अत्यंत चोखपणे पार पाडला. आणि त्यानंतर या मंडळाने कधी मागे वळून पाहिलेच नाही! भक्तांनी आणि दात्यांनी मंदिराच्या फंडासाठी उदारहस्ते देणग्या द्यायला सुरुवात केल्यावर तात्यासाहेब आणि त्यांचे मित्र यांना वाटू लागले, की या पैशांतून आपल्याच बांधवांची सेवा करण्याहून अधिक मोठी ईश्वर-सेवा काय असू शकणार?

लवकरच या ध्येयवेड्या तरुण कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या कार्याची व्याप्ती पारंपरिक पूजाअर्चेच्या पलीकडे नेऊन सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. मंदिरातले धार्मिक विधी थाटामाटाने साजरे करत असतानाच या तरुणांनी आपल्या राज्याच्या सामाजिक व राजकीय प्रश्नांकडे लक्ष वळवले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अखत्यारीत त्यांनी कितीतरी सामाजिक कार्यांचा प्रारंभ केला. वंचित मुलांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत, छोटे उद्योगधंदे करू इच्छिणाऱ्यांना किंवा फेरीवाल्यांना सुवर्णयुग सहकारी बँकेमार्फत आर्थिक साह्य, वृद्धाश्रम, वीटभट्टी-कामगारांचे पुनर्वसन ही नमुन्यादाखल काही उदाहरणे.

आज श्रीगणेशांच्या आशीर्वादाने ‘दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ ही एक आघाडीची संस्था म्हणून प्रसिद्ध झाली आहे. मानवजातीची सेवा हीच परमेश्वराची सेवा या भावनेने काम करण्याचे समाधान मोठे असल्याची भावना मंडळाचे कार्यकर्ते व्यक्त करतात.

ट्रस्टद्वारे वर्षभरात राबविण्यात येणारे उपक्रम :
-    सामाजिक व आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी १९७३पासून ‘सुवर्णयुग सहकारी बँक’ कार्यान्वित.
-    ‘जय गणेश’ रुग्णसेवा अभियानांतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालयात सुमारे १२०० दाखल रुग्णांकरिता दोन वेळचे भोजन, चहा आणि नाश्त्याची व्यवस्था, दाखल रुग्णांच्या नातेवाईकांकारिता तात्पुरत्या विश्रांतीगृहाची ससूनच्या आवारात व्यवस्था, तसेच अल्प दरात त्यांच्या भोजनाची व्यवस्था.
-    दुष्काळग्रस्त दत्तक गावांसाठी ‘जय गणेश’ स्वयंपूर्ण ग्राम अभियान, ‘जय गणेश’ आपत्ती निवारण अभियान.
-    महाराष्ट्रातील वारी मार्ग, अष्टविनायक मार्ग आणि प्रमुख महामार्गावर ५० लाख झाडे लावून ‘जय गणेश’ निसर्ग संवर्धन अभियान.
-    पुण्यातील ५०० गणेश मंडळांच्या सहभागातून खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम ‘जय गणेश’ जलसंवर्धन अभियानाद्वारे सुरू.
-    मंदिराच्या मागे गणपती सदन येथे विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य क्लासेस, अभ्यासिका, संस्कारवर्ग, संगणक प्रशिक्षणवर्ग, समुपदेशन इत्यादी सुविधा.
-    वैद्यकीय शिबिरे, रुग्णवाहिका सेवा.
-    पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील ६५ शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, ग्रामीण भागातील सुमारे २६ शाळांमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

-    कोंढव्यात ‘जय गणेश’ व्होकेशनल ज्युनियर कॉलेज.
-    सिंहगड रस्त्यावर वीटभट्टी कामगारांच्या १०० कुटुंबीयांसाठी घरकुले बनविण्यात आली.
-    देवदासींच्या निराधार-निराश्रित १०० बालकांसाठी कोंढव्याच्या परिसरात विनामूल्य शिक्षण, भोजन, निवास, समुपदेशन, संस्कार वर्गांची सोय.
-    कागद, काच, पत्रा वेचणाऱ्या महिला भगिनींच्या २५ मुलांचे पालकत्व ट्रस्टने घेतले आहे.
-    पिताश्री वृद्धाश्रम, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, आषाढी वारीतील वारकऱ्यांना फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे मोफत औषधोपचार सेवा, वारकऱ्यांकरिता मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप.
-    पोलिओ निर्मूलन मोहीम, संगीत महोत्सव, रात्र महाविद्यालय, सुवर्णयुग स्पोर्टस् क्लब, अंध, अपंग, विधवा, परित्यक्ता, अभागी महिलांसाठी छोटे उद्योग-व्यवसाय निर्मिती.
-    आपत्कालीन मदत, शिवजयंती व्याख्यानमाला, कृतज्ञता पुरस्कार, राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा, गणेश उत्सव विमा संरक्षण, प्रतिवर्षी चातुर्मासाचा एक महिना ह. भ. प. श्री. बाबामहाराज सातारकर यांची प्रवचने व कीर्तने.
-    मंदिर आणि परिसर विमा संरक्षण, भारतीय सैन्य दलातील शहीद जवानांच्या वीरमाता/वीरपत्नींना शौर्य गौरव पुरस्कार देण्यात येतो.
-    जय गणेश कुष्ठरोगी पुनर्वसन अभियान, गणेशजन्म सोहळा, मोगरा महोत्सव, वासंतिक उटीचे भजन, अक्षय्य तृतीयेला आंबामहोत्सव, वैशाख पौर्णिमेला शहाळे महोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव, तुलसीविवाह, काकड आरती, दैनंदिन अभिषेक.
-    दर मंगळवारी, तसेच महिन्याच्या प्रत्येक विनायकी चतुर्थीला गणेशयाग आणि संकष्टी चतुर्थीला महाभिषेकाची व्यवस्था, अंगारकी-चतुर्थी व प्रमुख सणांना मंदिरामध्ये स्वराभिषेकाचे आयोजन.
-    महत्त्वाचे सण तसेच अंगारकी चतुर्थीस पहाटेच्या वेळी मंदिरामध्ये संगीत क्षेत्रातील श्रेष्ठतम गायकांद्वारे गणरायांचरणी स्वराभिषेक.

वेबसाइट : www.dagdushethganpati.com

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZBGBF
Similar Posts
मंडईतला शारदा गजानन पुण्यातील गणेशोत्सवामध्ये जी महत्त्वाची मंडळे आहेत, त्यापैकी एक म्हणजे अखिल मंडई मंडळ. शारदा गजाननाची सुरेख मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य. या मंडळाबद्दल...
केसरीवाडा गणपती.. ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; गुरुजी तालीम गणेश मंडळ पुण्यातील गुरुजी तालीम गणेश मंडळाचा गणपती मानाचा तिसरा आहे. यंदा या मंडळाचे १३१वे वर्ष आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचे पुण्याच्या गणेशोत्सवातील महात्म्य अन्यन्नसाधारण आहे. या मंडळाबद्दल...
श्री कसबा गणपती लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी १८९३मध्ये पुण्यात सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे होत आहेत. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. काळानुसार या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले असले, तरी श्रद्धा कायम आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यनगरीतल्या मानाच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language